त्या’ बाळांसाठी डॉक्‍टर ठरले देवदूत

दहा वर्षांपासून आई होण्याची आस तिला लागून होती. मात्र, नशीब साथ देईना. अखेर तिने 28 एप्रिल रोजी एक, दोन, तीन नव्हे, तर चार बाळांना जन्म दिला. बालके कमी वजनाची होती. बालकांना वाचविणे, हा एकमेव ध्यास शासकीय रुग्णालयातील डॉक्‍टर आणि अतिदक्षता विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी बाळगला. त्यातील एक मुलगी आणि एक मुलगा दगावले. मात्र, 48 दिवस चाललेल्या या संघर्षात दोन बालकांना वाचविण्यात यश आले. त्या बालकांना आज सुटी देण्यात आली.

गोरेगाव तालुक्‍यातील जयवंता कोहरे या महिलेचे लग्न दहा वर्षांपूर्वी झाले. नामांकित डॉक्‍टरांकडे उपचार केल्यानंतरदेखील तिला गर्भधारणा होत नव्हती. अखेर तिला दिवस गेले. डॉक्‍टरांनी तपासणीत चार बाळ पोटात असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रसूती कशी होईल, या विचारात जयवंता कोहरे यांच्या घरची मंडळी होती. 28 एप्रिल रोजी शहरातील एका खासगी रुग्णालयात प्रसूती झाली. एक मुलगी आणि तीन मुलांना तिने जन्म दिला. मात्र, चारही बालकांचे वजन अत्यंत कमी असल्यामुळे त्यांना येथील बाई गंगाबाई शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पैकी दोन बालके दोन दिवसांतच दगावली. उर्वरित दोन बालकांपैकी एकाचे वजन एक किलो 190 ग्रॅम आणि दुसऱ्याचे वजन 190 ग्रॅम होते. त्या बाळांना वाचविणे हा एकच ध्यास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी धकाते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबरिश मोहबे, डॉ. संजीव दोडके, डॉ. सुरेश लाटणे आणि इंदुरकर यांच्यापुढे होता. 48 दिवस दोन्ही बालके डॉक्‍टरांच्या देखरेखीत होती. आज ती बालके सुदृढ असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *