मामाचं तोंड गोड करायला गेलेल्या सोनालीचा मृत्यू

मामाचं तोंड गोड करायला गेलेल्या सोनालीचा मृत्यू

पालघरच्या वाड्यामध्ये हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. जिच्या स्वप्नांना अजून पंखही फुटायचे होते, अशा सोनाली चव्हाणच्या कोवळ्या स्वप्नांवर काल नियतीने क्रूर वार केला. दहावीच्या यशाबद्दल आपल्या मामाचं पेढे भरवून तोंड गोड करण्यासाठी गेलेल्या सोनालीचा भिंत कोसळून मृत्यू झाला आहे.

दहावीच्या परीक्षेत सोनाली चव्हाणला 75 टक्के गुण मिळाले होते. गुरुवारी ती चुलत बहिणीसह वाड्यातील पाटील आळीत राहणाऱ्या मामाकडे निघाली होती. यावेळी पावसाची रिपरिप सुरु असल्यानं सोनाली आणि तिच्यासोबत असलेल्या बहिणीनं एका पडक्या घराखाली आसरा घेतला. मात्र, काही क्षणातच त्या घराची भिंत कोसळल्यानं सोनाली चव्हाणचा मृत्यू झाला.

आपल्या यशाचं कौतुक ऐकण्यासाठी गेलेल्या सोनालीचीच अखेर दुःखद वार्ता मिळाली. या घटनेनं गावाबरोबरच पंचक्रोशीतही हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात सोनालीची चुलत बहिण सोनमही जखमी झाली आहे, तिच्यावर ठाणे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *