पंजाबमधील लुधियाना येथील दोराहा येथे अमोनिया गॅस टँकरच्या गळतीमुळे ६ नागरिकांचा श्वास कोंडून मृत्यू झाला. अन्य १०० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
दोराहा बायपासजवळ फ्लायओव्हर खाली टँकर अडकल्यामुळे ही गळती झाली, असे पोलिसांनी सांगितले. अमोनिया गळतीमुळे आजुबाजुच्या परिसरातील १०० हून अधिक लोकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यांना त्वरित लुधियाना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील सात जणांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
हा गॅसचा टँकर गुजरातचा असून तो लुधियानाहून गुजरातकडे जात असताना शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे पथक दोराहा येथे पोहोचले असून त्यांनी दोराहा आणि परिसरातल्या गावातील लोकांना त्वरीत लाऊड स्पिकरवरुन घोषणा करुन सुरक्षितस्थळी हलवले.
त्याचवेळी तातडीने टँकरमधील गळती थांबवण्यात आली आणि पुलाखाली अडकलेला हा टँकर शनिवारी सकाळी बाहेर काढण्यात आला.
दरम्यान, घटनास्थळापासून पाच किलोमीटरच्या परिसरात गळतीचा परिणाम जाणवत असल्याचे येथील लोकांनी सांगितले.

