आनंदीबेन पटेल यांचा राजीनामा मंजूर

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी पाठविलेला राजीनामा आज (बुधवार) भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याचे, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.

मंगळवारपासून भाजपची संसदीय बैठक सुरु झाली असून, आज झालेल्या बैठकीत राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. वयाची 75 वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांना पद सोडायचे आहे. असे करून त्या चांगला पायंडा पाडत असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले होते. गुजरातचे नेतृत्व नव्या दमाच्या नेत्याकडे देण्याची वेळ आली असल्याचे सांगत मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. हे पत्र पक्षश्रेष्ठींकडे पाठवून नंतर “फेसबुक‘द्वारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

“मी नोव्हेंबरमध्ये वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण करत आहे. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि 2017 मधील व्हायब्रंट गुजरात परिषदेपूर्वी राज्याला नवे नेतृत्व मिळणे आवश्‍यक आहे,‘ असे आनंदीबेन पटेल यांनी “फेसबुक‘वर म्हटले आहे. 75 वर्षे पूर्ण केलेल्या नेत्यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घ्यावा, असे भाजपचे धोरण आहे. पदमुक्त करण्याची विनंती दोन महिन्यांपूर्वीच पक्षनेतृत्वाला केली असल्याचे आनंदीबेन यांनी सांगितले होते.
गेल्या वर्षी झालेले पाटीदार समाजाचे आंदोलन आणि त्यानंतर हार्दिक पटेलच्या अटकेवरून झालेला वाद यामुळे भाजप अध्यक्ष अमित शहा हे आनंदीबेन यांच्यावर नाराज असल्याचे चित्र होते. मंत्रिमंडळावरही त्यांचे नियंत्रण नसल्याचे सांगितले जात होते. तसेच, नुकत्याच राज्यात झालेल्या दलित मारहाण प्रकरणानंतर भाजप सरकारवर टीकाही झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *