1 ऑगस्टपासून पेट्रोल-डिझेल खरेदी बंद

‘नो हेल्मेट, नो पेट्रोल‘ या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातील पेट्रोल- डिझेल पंपचालकांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. मुंबईसह राज्यभरातील पेट्रोल- डिझेल वितरकांनी 1 ऑगस्टपासून पेट्रोल- डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय बुधवारी (ता. 27) घेतला. तोटा झाला तरी चालेल; पण पंपावरील कर्मचाऱ्यांवरील कारवाईचा उल्लेख आदेशातून वगळला जात नाही, तोपर्यंत खरेदी बंद राहील, अशी भूमिका पेट्रोल वितरक संघटनेने घेतली आहे.

मोटारसायकलस्वारांच्या वाढत्या अपघातांमुळे “नो हेल्मेट, नो पेट्रोल‘ हा निर्णय परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत जाहीर केला. त्याची अंमलबजावणी 1 ऑगस्टपासून करण्यासाठी वाहतूक विभागाने आराखडा तयार केला आहे. सरकारने प्रसिद्ध केलेल्या आदेशात पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत, त्याचा निषेध पेट्रोल वितरकांनी केला आहे. बुधवारी याबाबत वितरकांची राज्यव्यापी बैठक झाली. सामाजिक जबाबदारी म्हणून वाहतूक पोलिसांना सहकार्याची तयारी असताना आता पंपावरील कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारने उगारलेल्या कारवाईच्या बडग्याविरोधात निषेध व्यक्त केला.
1 ऑगस्टपासून वितरकांनी पेट्रोल- डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. दुचाकीस्वार हेल्मेट घालतात की नाही, हे पाहण्याची जबाबदारी आमची नाही, ते पोलिसांचे काम आहे, असे मुंबई पेट्रोल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष रवी शिंदे यांनी सांगितले. वितरकांच्या या निर्णयामुळे वाहनचालकांना पेट्रोल- डिझेलच्या टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे.

पेट्रोल- डिझेल पंप
– मुंबई – 222
– राज्यात – 6800

प्रति महिना मुंबईतील वापर
– पेट्रोल – 2 लाख 20 हजार लिटर
– डिझेल – 1 लाख 80 हजार लिटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *