कल्याणमध्ये सिलिंडर स्फोटात महिला ठार

कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी परिसरातील रमाबाई आंबेडकर नगरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात एक महिला ठार झाली असून ११ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी १० जणांना सायन रुगणालयात तर एकाला पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. यातील दोन जखमींची प्रकृती चिंताजनक असून इतरांची प्रकृती स्थिर आहे.

रमाबाई आंबेडकर नगर येथे रवींद्र गायकवाड यांचे दुमजली घर आहे. त्यांनी तळमजल्यावरील घर शेख आणि धनगर कुटुंबियांना भाड्याने दिले होते. सोमवारी सकाळी शबाना शेख यांच्या घरातील सिलिंडरमधून गॅसगळती होऊन प्रचंड मोठा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने आधारवाडीसह आसपासचा परिसर हादरला. या भीषण स्फोटात गायकवाड यांच्या घराचे प्रचंड नुकसान झाले असून आजूबाजूच्या घरांच्या काचाही फुटल्या. तर शेख यांच्याबरोबरच आवारे आणि धनगर राहत असलेल्या खोल्यांच्या भिंती कोसळल्या. यावेळी घरात झोपलेल्या तिन्ही कुटुंबातील ११ सदस्य जखमी झाले तर वृद्धेचा भिंती खाली पडून जागीच मृत्यु झाला.

अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी तसेच आपत्कालीन विभागाच्या कर्मचा-यांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरु केले. स्थानिकांनी तातडीने जखमींना उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. मात्र गॅसच्या उग्र वासामुळे जखमींना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात पाठवले आहे. यातील शबाना शेख आणि सलीम शेख गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडितांच्या कुटुंबाची विचारपूस केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *