राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासह क्रिकेट प्रशासनातून निवृत्त होण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला.
‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करताना अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास मी तयार आहे. माझ्या कारकीर्दीत अनेक चांगली कामे झाली. त्यामुळे निवृत्ती घोषणा करताना मला आनंद वाटतो,’’ असे पवार यांनी कार्यकारिणीच्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
सर्वोच्च न्यायालय नियुक्त आर. एम. लोढा समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह (बीसीसीआय) राज्य क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिका-यांसाठी ७० वर्षे कमाल वयोमर्यादा निश्चित केली आहे.
शरद पवार हे सध्या ७५ वर्षाचे आहेत. लोढा समितीच्या बहुतांश शिफारशी एमसीएने स्वीकारल्या आहेत. मात्र काही शिफारशींबाबत (विशेष करून एक राज्य, एक असोसिएशन) आम्हाला आक्षेप आहे. त्याबाबत स्पष्टीकरण हवे आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले.
‘‘सर्वोच्च न्यायालय नियुक्त लोढा समितीच्या शिफारशींबाबत एमसीए कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र एक-दोन मुद्यांवर आम्हाला स्पष्टीकरण हवे आहे. महाराष्ट्रात मुंबई क्रिकेट असोसिएशन, मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशन अशा तीन राज्य संघटना अहेत.
लोढा समितीची ‘रोटेशन’ पद्धत आम्हाला मान्य नाही. एमसीएचा ‘टर्न’ येईल तेव्हा आमचे कार्यक्षेत्र मुंबई, ठाणे किंवा नवी मुंबईपुरते मर्यादित राहणार नाही. आम्हाला रणजी करंडकासह अन्य देशांतर्गत क्रिकेट स्पर्धात उर्वरित महाराष्ट्रातील क्रिकेटपटूंचा समावेश करावा लागेल. हा ताळमेळ कसा साधावा, याबाबत स्पष्टीकरण द्यावे.
सर्वप्रथम आम्ही संघटनेच्या घटनेचे पुनर्लेखन करू. त्यानंतर कार्यकारिणीच्या विशेष समितीच्या बैठकीत हा मसुदा मंजूर करून घेऊ. सर्व शिफारशी लागू करण्यासाठी आमच्याकडे सहा महिने आहेत,’’ असे शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांनी १७ जून २०१५मध्ये चौथ्यांदा एमसीए अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. मात्र लोढा समितीच्या शिफारशींनतर त्यांना यावेळची ‘टर्म’ पूर्ण करता आली नाही. यापूर्वी, २००१ ते २०१० आणि २०१२मध्ये शरद पवार यांनी अध्यक्षपद भूषवले होते. पवार हे २००५ ते २००८ दरम्यान बीसीसीआय आणि २०१० ते २०१२ दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष होते.