मेट्रो रेल्वे स्थानकांवर दोनशे “बायोडायजेस्टर’ प्रसाधनगृहे

शहरातील मेट्रो रेल्वे प्रकल्प पर्यावरणपूरक करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मेट्रो रेल्वे स्टेशन, कार्यालये, डेपोमध्ये दोनशे “बायोडायजेस्टर‘ प्रसाधनगृहे उभारण्यात येतील. बायोडायजेस्टर तंत्रज्ञानाच्या सहकार्यासाठी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने आज संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) ग्वाल्हेर डीआरडीईसोबत करार केला.
डीआरडीई ग्वाल्हेर मेट्रो रेल्वेला बॅक्‍टीरियाच्या साहाय्याने मानवी घाणीवर प्रक्रिया करून पाणी शुद्धीकरण व त्याचा वापर करणारे तंत्रज्ञान निःशुल्क देणार आहे. याबाबत मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांच्या उपस्थितीत मेट्रो रेल्वेचे प्रकल्प संचालक महेशकुमार अग्रवाल व डीआरडीओचे संचालक व शास्त्रज्ञ डॉ. लोकेंद्रसिंग यांनी करारावर स्वाक्षरी केली. लोकेंद्र सिंग यांनी हे तंत्रज्ञान निःशुल्क देण्यात येणार असून, डीआरडीओचा पैसे कमविण्याचा उद्देश नसल्याचे सांगितले. भारतीय रेल्वेने या तंत्रज्ञानाने आतापर्यंत 2019 प्रसाधनगृहे लावली असून घरी तयार करण्यात येणाऱ्या सेप्टीक टॅंकच्या तुलनेत केवळ 25 टक्के खर्च असल्याचे सांगितले. महाराष्ट्र सरकारने नक्षलप्रभावित गडचिरोली, आलापल्ली भागातही या तंत्रज्ञानाच्या सहकार्याने बायोडायजेस्टर प्रसाधनगृहे लावली असल्याचेही त्यांनी नमूद केले. मेट्रो रेल्वे स्थानकावरील प्रसाधनगृहातील सांडपाणी मानवी घाणीवर प्रक्रियेसाठी डीआरडीईसारख्या संस्थेने सहकार्य करणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे मेट्रो रेल्वेचे प्रकल्प संचालक महेशकुमार अग्रवाल यांनी सांगितले. यावेळी मेट्रो रेल्वेचे आपटे, त्रिपाठी, ए. सहाय, डी. एम. रामटेके, सुनील माथूर, डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉ. व्ही. सिंग, डॉ. गोयल, डॉ. अनुराग पांडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *