हेल्मेट सक्तीमुळे होणार काळाबाजार?

दुचाकीस्वारांकडे हेल्मेट नसेल, तर त्यांना पेट्रोल पंपांवर पेट्रोल मिळणार नाही. ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ या धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. परिहवनमंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी (दि.21) विधानसभेत ही घोषणा केली. त्यामुळे शहरातील नागरिकांनी हेल्मेट खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी केल्याचे दिसून आले. हेल्मेटची मागणी वाढणार असल्याचे दिसताच, रस्त्याच्या कडेलाही हेल्मेट विक्री सुरू झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात हेल्मेटचा काळाबाजार होण्याची भीती नागरिकांनी ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली.
धास्तावलेल्या दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेटच्या दुकानांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केल्याचे पाहून, याचा फायदा घेत हेल्मेटच्या किमती अचानक वधारल्या आहेत. विशेष म्हणजे हेल्मेटवर कुठलीही किंमत नसल्याने, दुकानदारांनी सांगितलेली किंमत ग्राहकांना द्यावी लागत आहे. एकप्रकारे शहरात हेल्मेटचा काळाबाजार सुरू झाल्याचे चित्र सुरू आहे.
नामांकित कंपन्यांच्या हेल्मेटचे विक्रेते म्हणतात की, सक्ती केली की, हेल्मेट विक्रीवर त्याचा परिणाम होतो; परंतु कमी दर्जाची हेल्मेट विक्री करणार्‍यांकडे मात्र जास्त प्रमाणात गर्दी होते. शहरातील वाहनाचे सुटे भाग विकणार्‍या दुकानांत मोठ्या संख्येने हेल्मेट विक्रीस उपलब्ध आहेत; मात्र केवळ हेल्मेटची विक्री करणार्‍या दुकानांत आणि इतर दुकानांत एकाच कंपनीच्या हेल्मेटची किंमत वेगवेगळी आहे. या हेल्मेटवर कुठेही किंमत लिहिलेली दिसून येत नाही. यापूर्वी परिवहन आयुक्त श्याम वर्धने यांनी दुचाकी विक्रेत्यांना एका दुचाकीसोबत दोन हेल्मेट देण्याच्या सक्तीचे आदेश दिले आहेत. यामुळे हेल्मट विक्रेत्यांकडे ग्राहकांनी गर्दी केली होती. शहरात  बनावट हेल्मेटचा सुळसुळाट सुरू झाला आहे. विशेषत: महिलांसाठी असलेल्या हेल्मेटमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शहरातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हॅरिस पुलापासून ते निगडीपर्यंत अनेक विक्रेते रस्त्यावर हेल्मेट विक्री करत आहेत. रस्त्याच्या बाजूला विक्री करणारे विक्रेते जे हेल्मेट 600 रुपयांना विकतात, त्याची दुकानांमध्ये किमत 300 रुपये असल्याचे आढळले.
दुकानांमध्ये नामांकित हेल्मेटवर ‘आयएसआय’ प्रमाणित असल्याचा लोगो असतो, ‘आयएसआय’ प्रमाणित हेल्मेटची योग्यता तपासणी कोण करते, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *