चित्रकार ऐझॅक होळकर यांचे निधन

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार व सामाजिक कार्यकर्ते ऐझॅक हंबीरराव होळकर (वय८०) यांचे बुधवारी रात्री वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर मिरज येथील ख्रिश्चन दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

अमूर्त शैलीतील जागतिक स्तरावरील एक महत्त्वाचे चित्रकार अशी चित्रकला क्षेत्रात त्यांची ओळख होती. त्यांचे चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या दळवीज् आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये झाले. १९५३ मध्ये मिशन स्कॉलरशीप मिळवून जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना चित्रकला अध्ययनाची संधी मिळाली. बालचित्रकला क्षेत्रातील त्यांच्या संशोधनाबद्दल तत्कालीन पंतप्रधान कार्यालयाने त्यांचा विशेष सन्मान केला होता. आर्ट स्टुडंट व ख्रिश्चन मिशनरी या दोन्ही भूमिका त्यांनी अमेरिकेतही अत्यंत तळमळीने बजावल्या. त्यांच्या चित्रांची अनेक प्रदर्शने अमेरिकेत विविध शहरांतून झाली होती. अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांनी झोपडपट्टीतील मुलांसाठी इसा बाल संगोपन सेवा संस्था सुरू केली. त्याचबरोबर इमॅन्युअल इंग्लिश स्कूल, सांगली, बिशप इंग्लिश स्कूल, इचलकरंजी, कॅमरन स्कूल अॅन्ड चर्च, मिरज या संस्थांमध्येही त्यांनी पदाधिकारी म्हणून कार्य केले. आजवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *