सुखकर्ता, दुखहर्ता…’ किंवा ‘ॐ गं गणपतये नमः’ असे स्वर प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गुंजत होते, मात्र तेथे आता इक्वीटी शेअर्स, सिक्युरिटी बॉण्डसची भाषाही ऐकायला मिळणार आहे. जे भक्त गणपतीला इक्वीटी शेअर्स, बॉण्डस दान करू इच्छितात त्यांच्यासाठी मंदिर प्रशासनाने डीमॅट खाते उघडले आहे. श्री सिद्धिविनायक गणपती टेम्पल ट्रस्ट(प्रभादेवी) मुंबई या नावाने हे खाते आहे. गतवर्षी तिरुपती बालाजी मंदिर प्रशासनाने ही सुविधा आपल्या भक्तांना उपलब्ध करून दिली होती. त्याला मोठा प्रतिसाद लाभत असल्याने गणपती मंदिर प्रशासनानेही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवल्याचे दिसून येते.
प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराची गणना देशातील श्रीमंत देवस्थानांमध्ये होते. गरीबांपासून श्रीमंतातील अतिश्रीमंत व्यक्तीपर्यंत सिद्धिविनायकाचे भक्त जगभर पसरले आहेत. अमिताभ बच्चनसारखा सुपरस्टारही जुहू-विलेपार्ले स्कीमपासून प्रभादेवीपर्यंत चालत जाऊन गणपतीचे दर्शन घेतो. साहजिकच श्रीमंत भक्तांमुळे देवस्थानच्या खजिन्यातही मोठी भर पडते. त्यात पैशांबरोबरच नवरत्नांचा, सोन्या-चांदीसारख्या धातूंचाही समावेश असतो. मात्र, या व्यतिरिक्त शेअर्स, बॉण्डसची भाषा करणाराही एक टेक्नोसॅव्ही श्रीमंत वर्गही आहे. अशा वर्गाची कुचंबना होऊ नये म्हणून ट्रस्टने हे पाऊल उचलले आहे. एसबीआयकॅप सिक्युरिटी लिमिटेडकडे हे सीडीएसएल डीमॅट अकाऊण्ट सुरू करण्यात आले असून ते श्री सिद्धिविनायक गणपती टेम्पल ट्रस्ट(प्रभादेवी) मुंबई या नावाने आहे. या डीमॅट अकाऊण्टमुळे सिद्धिविनायकाला शेअरसारख्या अन्य सिक्युरिटीचे दान करू इच्छिणार्या जगभरातील भक्तांची सोय झाली आहे.
डीमॅट अकाऊण्ट उघडणारे सिद्धिविनायक मंदिर हे राज्यातील पहिलेच मंदिर ठरले आहे. याद्वारे मंदिर प्रशासनाला शेअर बाजारात होणार्या घडामोडीमध्येही भाग घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.