भोकरदन तालुक्यातील पिंपळगांव रेणुकाई येथील एका शेतकऱ्याने लागवड केलेल्या मका पिकावर मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने तीन एकर मोडून टाकल्या नंतर परत रविवारी याच भागातील दुसऱ्या शेतकऱ्याने चार एकर मका मोडली आहे. या मुळे दोन्ही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यावर्षी चांगला पाऊस आहे या हवामान खात्याच्या अंदाज मूळे शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून मोठ्या मेहनतीने लागवड व पेरणी केली. जून मध्ये पावसाने लपंडावचा खेळ खेळला तर जुलै च्या पहिल्या आठवडयात पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत असतानाच मका पिकांवर रोग पडला आहे. या पिकावर खोड कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे यामुळे मकाची वाढ खुंटली असून मका पिवळी पडत आहे .
शेतकरी मका पिकाला वाचविण्याची मोठा खर्च व धडपड करीत असले तरी काही ठिकाणी अपयश येत असल्याने शेतकरी मका पीक मोडीत असल्याचे चित्र आहे. आता अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.
दरम्यान पिंपळगांव रेणुकाई येथील बबनराव देशमुख या शेतकऱ्याने आपली तिन एकर शेतात लागवड केलेली मका याच कारणामुळे शनिवारी मोडली होती आता त्यांच्या पाठोपाठ याच भागातील गोकुळ राजपूत यांनी चार एकर मका पिकावर वखर फिरवला आहे. त्यांचे हे पिक जळुन चालले होते ओषधी फवारणी करुन देखील ऊपयोग होत नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. मका पिकांवर रोग पडला असताना कृषी विभाग झोपी गेल्याचा आरोप होत आहे.