शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी सोमवारची अखेरची ‘डेडलाइन’ असल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशीही प्रशासनाकडून खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. शहराच्या विविध भागातील प्रमुख 50 रस्त्यांची पाहणी करून त्यावरील खड्डे बजविण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला.
जवळपास दीड ते दोन आठवडाभर सुरू असलेल्या पावसाने शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामध्ये काही नव्याने डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांचाही समावेश आहे, त्यामुळे महापालिकेवर जोरदार टीका होण्यास सुरुवात झाल्यानंतर महापौरांनी प्रशासनाची बैठक घेऊन सोमवारी (दि. 18) रात्रीपर्यंत शहर खड्डे मुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुदतीत खड्डे न बुजल्यास अधिकार्यावर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग आला आहे. त्यासाठी पथ विभागाने स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. तसेच ज्या नवीन रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. ते संबंधित ठेकेदारांकडूच दुरुस्त करण्यात येत आहेत. दरम्यान, सोमवारची अखेरची मुदत असल्याने रविवारी सुटीच्या दिवशी खड्डे बुजविण्यासाठी तब्बल साडेतीनशे कर्मचारी कार्यरत होते. प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम जवळपास होत आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.