अध्यक्षीय संघाविरुद्ध तीनदिवसीय सराव सामना आजपासून
वेस्ट इंडिजविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी गुरुवारपासून सुरू होणाऱ्या अध्यक्षीय संघाविरुद्धचा सराव सामना हा जणू भारतासाठी रंगीत तालीमच असणार आहे. या तीनदिवसीय सराव सामन्यातील कामगिरीनंतर पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाचे अंतिम ११ खेळाडू निश्चित होणार आहेत. त्यामुळे नवनिर्वाचित प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांचे आपल्या कामगिरीसह लक्ष वेधण्याचा खेळाडूंचा प्रयत्न असेल. पहिल्या दोनदिवसीय सराव सामन्यात भारताचे वेगवान गोलंदाज झगडताना आढळले. याचप्रमाणे सांघिक कामगिरीसुद्धा लक्षणीय नव्हती. दुखापतीतून परतल्यावर मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांनी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतल्यावर चांगली सुरुवात केली. मात्र लाइन आणि लेंग्थ या बाबतीत त्यांनी निराशा केली. अनुभवी इशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्याकडूनसुद्धा कोहलीची उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. त्यामुळे मुंबईकर वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला संधी मिळते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सराव सामन्यात भारताचा वेगवान मारा निष्प्रभ ठरताना लेग-स्पिनर अमित मिश्राने नेत्रदीपक गोलंदाजी केली. राजेंद्र चंद्रिका आणि जर्मेन ब्लॅकवूड यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केल्यामुळे मिश्राला हॅट्ट्रिकची संधी चालून आली होती, परंतु ती त्याला साधता आली नाही. मिश्राने त्या सामन्यात चार बळी घेतले. फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हेसुद्धा या सराव सामन्यात आपली गोलंदाजी अजमावतील. फलंदाजीत भारताच्या आघाडीच्या फळीने उत्तम कामगिरी केली होती. सलामीवीर के. एल. राहुल आणि शिखर धवन यांनी अर्धशतके झळकावली होती. कसोटी क्रिकेटमध्ये धवनच्या फलंदाजीत सातत्य कधीच दिसून आले नव्हते. सलामीच्या स्थानासाठी मुरली विजय हा आणखी एक स्पर्धक आहे. चेतेश्वर पुजाराने डाव सोडण्यापूर्वी १०२ चेंडूंत ३४ धावा केल्या होत्या, तर रोहित शर्माने १०९ चेंडूंत नाबाद ५४ धावा काढल्या. तथापि, कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी त्या सामन्यात निराशा केली होती. –
संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, लोकेश राहुल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, उमेश यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, स्टुअर्ट बिन्नी. –
वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ अध्यक्षीय संघ : लिऑन जॉन्सन (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवूड, राजेंद्र चंद्रिका, रोस्टन चेस, जेसन डेवीज, शेन डॉरिच, शाय होप, डॅमिन जेकॉब्स, किऑन जोसेफ, माक्र्विनो मिंडले, विशॉल सिंग, जोमेल वॉरिकॅन.