फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अद्यापपर्यंत एकही भारतीय आढळून आला नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. “आमचे पॅरिसमधील राजदूत नीसमधील भारतीय समुदायाच्या संपर्कात आहेत. हल्ल्यात अद्यापपर्यंत एकही भारतीय नागरिक मृत्युमुखी पडल्याचे वृत्त नाही.‘ तसेच भारतीय दूतावासाने पॅरिमध्ये मदत क्रमांकही (33-1-40507070) जाहीर केले आहेत. फ्रान्समध्ये राष्ट्रीय दिनानिमित्त सुरू असलेल्या सेलिब्रेशनदरम्यान एक ट्रक प्रचंड गर्दीच्या ठिकाणी अचानक घुसल्याने मोठा अपघात झाला आहे. त्यामध्ये आतापर्यंत किमान 80 जण ठार तर 100 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्याबाबत अद्याप खात्री पटलेली नाही.