वऱ्हाडातील पूर्व-पश्चिम वाहणारी पूर्णा नदी मंगळवारी पहाटेपासून पुन्हा पात्राबाहेर वाहू लागली. पूर्णेच्या पुरामुळे सातपुड्याला लागून असलेल्या जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, अकोट या तालुक्यांचा संपर्क तुटला होता. या नदीवर असलेल्या पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पूर्णेचे पाणी काठावरील शेतांमध्ये घुसल्याने शेकडो एकर शेतजमीन खरडून गेली आहे.
यात प्रामुख्याने तेल्हारा, बाळापूर, शेगाव, संग्रामपूर तालुक्यांतील पूर्णेच्या काठावरील जमीन आहे. मागील आठवड्यातच या भागांतील पेरण्या आटोपल्या होत्या. मागील 24 तासांत बुलडाणा, अकोला, वाशीम या तीनही जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. त्यात प्रामुख्याने सर्वाधिक पाऊस मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, खामगाव, मलकापूर, नांदुरा, मोताळा, बाळापूर या तालुक्यांत झाला.
धरणांची पाणीपातळी वाढली
अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पाची पातळी मंगळवारी सहा फुटांनी वाढली आहे. या धरणात 8.5 टक्के जलसाठा वाढला आहे. याशिवाय, वाण धरणात 50 टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा झाला आहे. मोर्णा धरणात 2.7 टक्के वाढ झाली आहे.