शासनाच्या चुकीच्या आणि अन्यायकारक धोरणाविरोधात सोलापूर शहरातील शिक्षण संस्थाचालकांनी मंगळवारी बैठक घेऊन शासनाविरोधात एल्गार पुकारण्याची घोषणा केली. यावेळी सर्व संस्थाचालकांनी एकत्रित होऊन संघटना निर्माण करून शासनाच्या जाचक आदेशांना संघटनेमार्फत उत्तर देण्याचा निर्धार करण्यात आला.
येथील शासकीय विश्रामगृहात ही बैठक पार पडली. यावेळी शासनाच्या कडक नियमावलींमुळे शिक्षण संस्थांना आपल्या संस्था चालविणे अवघड झाले आहे. या नियमांना संघटनेमार्फत उत्तर देऊ, असे बैठकीत ठरवण्यात आले. शहरातील अनेक क्षेत्रिय भाषिक शिक्षण संस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आपल्यात एकजुटीपणा नाही. त्यासाठी एका प्लॅटफॉर्मवर येऊन सर्वांना एकत्रित येण्याची वेळ आली आहे, असे जे. आय. इंगळगी यांनी व्यक्त केले. या संघटनेत अनुदानित व विनाअनुदानित संस्थाचालक असतील, असे घोषित करण्यात आले.
पालकवर्ग आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळांत दाखल करत आहेत.त्यामुळे मराठी, उर्दू, कन्नड, तेलुगू या शाळांना शासन अनुदान देण्यास मागेपुढे करत आहे. पटसंख्या कमी होण्यामागे कारण फक्त शासन आहे; परंतु संस्थाचालकांना वेठीस धरले जात आहे. लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मान्य करून घेऊ.
संस्थाचालक इनामदार यांनी मार्गदर्शन करताना एकजुटीने काम करण्याचा सल्ला दिला. संस्थांचे स्वातंत्र्य धोक्यात येत आहे. यासाठी आपल्या हक्कासाठी लढणे खूप गरजेचे झाले आहे.
शिक्षण क्षेत्राशी निगडित 1981 च्या नियमावलीनुसार शासनाशी बोलू. सोलापूर शहरातील भविष्यात कोणतीही शाळा बंद पडू देणार नाही अशी कार्ययोजना नव्याने स्थापन होणार्या संघटनेची असेल, असे या बैठकीत ठरवण्यात आले.
बैठकीत सोलापूर शहर व जिल्हा खासगी शिक्षण संस्था असे नाव ठरवण्यात आले आहे. यामधील पदाधिकारी याप्रमाणे आहेत.अध्यक्ष- नागनाथ सुरवसे, उपाध्यक्ष- फैज इनामदार, कार्याध्यक्ष- ए.जी. कुंभार, सचिव- आय.जे .इंगळगी, खजिनदार- भारत कटारे व कार्यकारिणी सदस्यांमध्ये दशरथ गोप, जितेंद्र पवार, राजकुमार हंचाटे, रिजवान शेख, सरवदे. बी.एस. कस्तुरे (ज्ञान संवर्धक शिक्षण प्रसारक मंडळ), आर.एस. पाटील (सिध्देश्वर देवस्थान शिक्षण संकुल), विठ्ठल जाधव (मातोश्री सीताबाई शिक्षण प्रसारक मंडळ), सिकंदरताज पाटील (ताज एज्युकेशन), नगरसेवक आर.बी. हंचाटे (श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ), वैजुनाथ हत्तुरे (श्री मल्लिकार्जुन हायस्कूल) आदी शिक्षण संस्थाचालक उपस्थित होते.