चौथ्या पिढीसह आजीबाईंची वारी

वयाची शंभरी ओलांडलेल्या आजी आपल्या चौथ्या पिढीतील सदस्यांसह तुकोबांच्या पालखी सोहळ्यात आजही आषाढी वारी करीत आहेत. गेली आठ तपे त्या वारीत चालत आहेत. त्यांच्या वारीचा प्रवास तरुणांना निश्‍चितच प्रेरणादायी आहे.

भीमाबाई गेनूजी ढगे (वय १०२ वर्षे, वडगाव पीर, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे त्या आजींचे नाव. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात संत सेवक प्रासादिक दिंडी क्र. २५४ सोबत त्या आहेत. आपल्या कुटुंबातील २२ सदस्यांसह त्या वारीच्या वाटेवर आहेत. त्यांना पाच मुले व चार मुली अशी नऊ अपत्ये. त्यापैकी दोन मुले व दोन मुली, त्यांच्या सुना, नातू, पणतू आजींसोबत आहेत. त्यांचा एक मुलगा ज्ञानेश्‍वर ढगे कीर्तनकार आहे. आजींची तब्येत अजून ठणठणीत आहे. वाढत्या वयामुळे सुरकुतलेला चेहरा एवढाच काय तो फरक. खणखणीत आवाज असलेल्या भीमाबाई ढगे सांगत होत्या, लग्नाच्या आधी वयाच्या १७व्या वर्षापासून वडिलांसोबत मी आषाढी वारी पायी करत आहे. आज माझी मुले, मुली, सुना, नातू, पणतू वारीत आहेत. माझे लग्न जमविताना सुद्धा होणाऱ्या पतीला तीन आठवडे मला आषाढी वारीसाठी वेळ द्यावा लागेल, असे ठणकावून सांगितले होते. त्यांनी ते मान्य केले. अनेक वर्षे माउलींच्या सोहळ्यात पायी वारी केली. पोरं सहा महिन्यांची होती, त्या वेळी सुद्धा त्यांना पाठीवर घेऊन वारी केली. अगदी कठीण प्रसंगातच वारी चुकली; अन्यथा आजतागायत वारी चालूच आहे. अलीकडच्या काही वर्षांत तुकोबांच्या सोहळ्यात चालत आहे. पायाचे ऑपरेशन झाल्यापासून गेली तीन वर्षे गाडीत बसून वारी करते. मी आजही कोणाची मदत न घेता कसल्याही आधाराशिवाय चालते. स्वतःची कामे स्वतः करते. मात्र, माझी मुलं मला आता चालू देत नाहीत, असेही आजीबाईंनी सांगितलं. या दिंडीतील पुरुषोत्तम पाटील (वाडे, ता. भडगाव, जि. जळगाव), निवृत्ती सदगीर, एकनाथ सदगीर (ठाणे), ज्ञानेश्‍वर ढगे, लीलावती गोरडे हे देखील चार तपांहून अधिक वर्षांपासून पायी आषाढी वारी करीत आहेत.

मला मधुमेह, हृदयविकार असला कुठलाच आजार नाही. वारीत चालताना सर्दी, खोकला, ताप असा कोणताच त्रास होत नाही. वारीत पहाटे चार वाजता टॅंकरखाली गार पाण्याने अंघोळ करते. आजही मी मूठभर चणे खाते. ऊस स्वतः सोलून खाते. ही तर पांडुरंगाचीच कृपा.
– भीमाबाई ढगे, वडगाव पीर, ता. आंबेगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *