भारताचे माजी कसोटीपटू व यष्टीरक्षक हेमंत कानिटकर यांचे प्रदीर्घ आजाराने मंगळवारी रात्री पुणे येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७७ वर्षे होते. त्यांचा मुलगा हृषिकेश कानिटकर हा सुद्धा भारतीय क्रिकेट संघाकडून खेळला आहे. कानिटकर यांनी १९६३-६४ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
१५ वर्षे महाराष्ट्राकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेल्या कानिटकर यांनी सौराष्ट्राविरुद्ध पदार्पण करताना पहिल्याच सामन्यात शतक झळकावण्याची किमया साधली होती. प्रथम श्रेणीतील दीड दशकांच्या कारकिर्दीत कानिटकर यांनी ४२.७९च्या सरासरीने ५००७ धावा केल्या. यामध्ये १३ शतकांचा समावेश होता. त्यांचा मुलगा हृषिकेश हा भारतीय संघाकडून २ कसोटी ३४ एकदिवशीय सामने खेळला आहे. त्यांना केवळ दोनच कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली.
१९७०-७१च्या रणजी क्रिकेट स्पर्धे कानिटकर यांनी केलेल्या बहारदार कामगिरीमुळे महाराष्ट्राला अंतिम फेरीत धडक मारता आली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन त्यांची वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यासाठी निवड करण्यात आली होती. निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरवताना त्या कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्यांनी ६५ धावांची खेळी केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे.

