ढगाळ वातावरण, अधूनमधून वाहणारे जोरदार वारे आणि रिपरिप करत मुंबईला चिंब भिजवणारा पाऊस.. असे पावसाळी वातावरण गेल्या आठवडाभरापासून मुंबईकर अनुभवत आहे. विशेष म्हणजे मध्यरात्री, पहाटे आणि सायंकाळीच पाऊस बरसत असल्याने दिवसभरात चाकरमान्यांना विश्रांती मिळत आहे.
येते २४ तास मुंबईसह राज्यातील विविध भागांत पावसाचा प्रभाव कायम राहणार असून कुलाबा वेधशाळेतर्फे मच्छीमारांना इशाराही देण्यात आला आहे. उत्तर आणि दक्षिण किनारपट्टीवरील वातावरणाचा अंदाज लक्षात घेता कुलाबा वेधशाळेतर्फे मच्छीमारांना समुद्रकिनारी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वरुणराजाच्या आगमनाने नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. अजून मुसळधार पाऊस झालेला नसला तरी सातत्याने होणारा पावसाचा शिडकावा नागरिकांना सुखावत आहे. सकाळपासूनच आकाशात ढगांनी गर्दी केल्याचे पाहून प्रत्येकजण छत्री, रेनकोट घेऊन घराबाहेर पडत आहे. थांबत थांबत का होईना, पण पावसाची रिपरिप कायम राहिल्याने कमाल तापमानाचा पारा घटला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
कुलाबा येथे कमाल ३०.५ अंश सेल्सिअस, किमान २६.२ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ येथे कमाल ३२.४ अंश सेल्सिअस, किमान २४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुधावरी सकाळी उपनगरात पावसाचा किंचीत शिडकाव झाला. येते २४ तास शहर परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर येते कोकण-गोवा, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
