रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची दुसरी टर्म स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर रुपया सोमवारी डॉलरच्या तुलनेत जबरदस्त घसरला. तीन महिन्यांत डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात एक टक्के घसरण झाली आहे.
सोमवारी एका डॉलरची किमत ६७.४० इतकी होती. या वर्षातील हा निचांक आहे. एका वर्षात रुपया डॉलरच्या तुलनेत ६९ पैसे इतकी नीचांकी पातळी गाठेल, अशी शंका आता व्यक्त होते आहे.
रुपयाच्या मूल्यातील या घसरणीचा थेट परिणाम महागाई आता गगनाला भिडणार आहे. रुपयातील घसरणीमुळे पेट्रोल आणि डिझेलची आयात आणखी महाग होणार आहे. भारत आपल्याला लागणारे ८० टक्के पेट्रोल-डिझेल आयात करतो. त्यामुळे या दोन्ही इंधनांच्या किमती वाढतील.
तेल कंपन्या दोन्ही इंधनांच्या देशांतर्गत किमती वाढवण्याचा पर्याय स्वीकारतील. डिझेलचे दर वाढल्याने वाहतूक क्षत्राला फटका बसेल. ही दरवाढ ते ग्राहकांना पास ऑन करणार असल्याने अनेक वस्तूंच्या किमती झपाटयाने वाढणार आहेत.
भारत खाद्यतेल आणि डाळी मोठया प्रमाणावर आयात करत असल्याने आधीच महाग असलेल्या डाळी आणखी महाग होतील. डॉलरचे मूल्य एक रुपयाने वाढले तर तेल कंपन्याना ८ हजार कोटी रुपयांचा तोटा होतो.
परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना तर याचा थेट फटका बसतो. कारण रुपयाच्या बदल्यात त्यांना कमी पैसे मिळतात. त्यांना आता जास्त पैसे खर्चावे लागतील.