मुंबई – गेल्या ४२ वर्षांपासून परळच्या केईएम रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणा-या अरुणा शानबाग यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
कोमात असलेल्या अरुणा शानबाग यांची प्रकृती शु्क्रवारी अचानक बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. निमोनिया आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मागील तीन दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी अरुणा या उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे केईएमचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, अरुणा शानबाग यांचे कोणी नातेवाईक असल्यास त्यांनी पुढे यावे असे आवाहन केईएम रुग्णालय प्रशासनाने केले आहे.
१९७३ मध्ये रुग्णालयातील एका वॉर्डबॉर्यने त्यांच्यावर पाशवी बलात्कार केला होता. या वेळी झालेल्या मारहाणीत अरुणा यांच्या मेंदूची नस दुखावली गेली होती. तेव्हापासून त्या कोमातच होत्या. गेली ४२ वर्षे रुग्णालयातील परिचारिका आणि डॉक्टर्स त्यांची काळजी घेत होते.
काही वर्षापूर्वी अरुणा यांची एक मैत्रीण पिंकी विराणी यांनी अरुणा यांना दया मरण द्यावे, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु, दया मरणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. दरम्यान, अरुणावर बलात्कार करणारा वॉर्डबॉय शिक्षा भोगून बाहेरही पडला. मात्र त्यानंतरही अरुणा यांचा संघर्ष सुरुच होता. अखेर सोमवारी त्यांची मृत्यूशी झुंज संपली.