झिम्बाब्वे दौऱ्यानंतर भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून विश्रांती मिळणार आहे. हा काळ मला मुलीशी पिता म्हणून जवळीक वाढवण्यास पूरक ठरेल, अशी भावनिक प्रतिक्रिया धोनीने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. झिम्बाब्वे विरुद्धची मालिका जिंकल्यानंतर आता तू प्रदीर्घ काळासाठी ब्रेक घेणार का? या प्रश्नाच्या उत्तरात धोनी भावूक झाला. तो म्हणाला की, ‘‘झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेनंतर बऱ्याच काळाने मला थोडी विश्रांती मिळणार आहे. माझी १५ महिन्यांची कन्या झिवा मला ओळखेल की नाही, याची खात्री नाही. विश्रांतीचा काळ मुलीला आपल्या पित्याशी जवळीक वाढवण्यास उपयुक्त ठरेल. माझ्या कुटुंबीयांसोबत छान वेळ घालवेन,’’ असे धोनीने सांगितले. धोनी आता ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत दिसणार आहे.