उंटवाडी येथील नाशिक मर्चंट को.ऑपरेटिव्ह बँकेच्या पाटील नगर शाखेत प्रवेश करत दोन अज्ञात चोरट्यांनी लुट करण्याचाअयशस्वी प्रयत्न केला. या घटनेमध्ये चोराला पकडताना झालेल्या झटापटीत वरिष्ठ लिपिक हरेंद्र भालेराव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. शुक्रवारी (दि.10) रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी अंबड पोलिसात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
रात्री आठ वाजेच्या सुमारास बुरखाधारी दोन चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. यावेळी महिला कर्मचारी प्रतिभा भुजबळ यांना चोरट्यांनी धमकावत देत पैशांची मागणी केली.तसेच, दुसर्या मजल्यावरील हरेंद्र भालेराव यांच्या कॅबिनमध्ये दुसर्याने प्रवेश केला. मात्र, भालेराव यांनी प्रसंगावधान राखून आराडाओरड केली. त्यामुळे चोरट्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, भालेराव यांनी चोराला पकडून ठेवले. यावेळी जिन्यामध्ये दोघांमध्ये जोरदार झटापट झाली. त्यामध्ये भालेराव यांचे डोके आपटल्याने गंभीर इजा झाली. दोन्ही चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.