कोईंमतूर येथे एका धक्कादायक घटनेत मुलीने प्रियकराच्या मदतीने वडीलांचा खून केल्याचे उघड झाले आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव पी नागराज (६०) असून त्यांचा मुलीच्या प्रेमाला विरोध होता. २३ मेरोजी हा खुनाचा प्रकार घडला असून या संदर्भात त्यांची मुलगी एन महालक्ष्मी, तिचा बॉयफ्रेंड एस सतीश आणि अन्य चार जणांना अटक केली आहे. या खुनात पी नागराज यांची पत्नी प्रमिला हिचाही सहभाग असून ती फरार झालेली आहे.
पी. नागराज यांचा दुधाचा व्यवसाय असून त्यांची एक केमिकल फॅक्टरी आहे. त्यांची मुलगी एन महालक्ष्मी आणि एस सतीश यांच्यात गेली काही महिने प्रेमप्रकरण सुरू आहे. सतीशचा कोणताही कामधंदा करत नाही. नागराज यांना जेंव्हा हे प्रकरण समजले तेंव्हा ते भयंकर संतापले. विशेष म्हणजे मुलगीला आईचे पाठबळ असल्याचे पाहून तर त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली होती. यानंतर प्रमिला आणि एन. महालक्ष्मी यांना त्यांनी दुसरीकडे राहण्यास सांगितले होते. पण काही दिवसांपूर्वी पी. नागराज यांचा मुलगा विग्नेश याचा अपघात झाल्याने या दोघी घरी आल्या. त्यावेळी प्रमिला हिने केमिकल फॅक्टरी मुलीला देण्याची मागणी केली, पण नागराज यांनी या बाबीला विरोध दर्शवला.
त्यानंतर महालक्ष्मीने वडिलांच्या खुनाचा कट रचला. यासाठी तिने प्रमिलाकडून दीड लाख रुपये घेतले.
२३ जुनला वडील फार्म हाऊसवर जाणार आहेत, हे समजल्यानंतर तिने ही माहिती सतीशला दिली. सतीश आणि त्याच्या चार मित्रांनी फार्म हाऊसवर जाऊन नागराज यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करून खून केला.
या खूनाच्या तपासात सुरुवातीला कोणतेचे धागेदोरे हाती लागत नव्हते. पण नागराज यांच्या काही नातलगांनी सतीश आणि महालक्ष्मी यांच्यातील प्रेमला नागराज यांचा विरोध होता, अशी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तपासाचा रोख या दोघांच्या दिशेने केला. तसेच तपासासाठी स्वतंत्र टीमही नेमली.
सध्या सतीश, महालक्ष्मी आणि त्यांचे चार मित्र न्यायालयीन कोठडीत आहेत.