समाजोपयोगी कार्यक्रमातून मित्राला आदरांजली

समाजोपयोगी कार्यक्रमातून मित्राला आदरांजली

मित्र गेला तरी मैत्री कायम ठेवत पिंपळगाव (वा.) (ता. देवळा) येथील तरुणांनी आपल्या दिवंगत मित्राच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान, कीर्तन व स्वच्छता मोहीम राबवत आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली.

पिंपळगावचे इंद्रराज सोनार यांचा गेल्या वर्षी अपघातात वयाच्या 38 व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी या अशा सुखी परिवाराचा आधारच गेला. त्यांची ही अशी एक्‍झिट त्यांच्या मित्र परिवाराला चटका देऊन गेली. सोनार यांच्या कुटुंबाला आधार देण्याबरोबरच त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त नाशिक, पिंपळगाव व इतर मित्रांनी गावातच रक्तदान शिबिराचे आयोजन केले. विशेष म्हणजे या शिबिरात मित्राच्या प्रेमापोटी तब्बल 74 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. याशिवाय, समाजप्रबोधन होण्याच्या दृष्टीने निवृत्तिनाथ महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. गावात स्वच्छता मोहीम राबवून या आपल्या प्रिय मित्राच्या नावाने गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्याचे त्यांचे नियोजन आहे. खरे तर हे सर्व करण्यासाठीचा मोठा खर्च या मित्रांनीच उचलला. मित्राच्या आठवणी अशा समाजपूरक उपक्रमातून जागविण्याच्या पद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेत मैत्रीचे हे अनोखे रूप इतरांना निश्‍चित प्रेरणादायी असेच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *