मुंबई काँग्रेसचे २५ नगरसेवक राजीनामा देणार ?

मुंबई काँग्रेसचे २५ नगरसेवक राजीनामा देणार ?

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी अचानक राजकीय सन्यासाची घोषणा केल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. कामत यांची नाराजी वेळीच दूर केली नाही तर, पक्षात फाटाफूट होऊ शकते.
कामत यांचे मुंबई काँग्रेसमधील समर्थक पक्षावर नाराज असून, कामत यांच्या समर्थनासाठी २५ नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. मुंबई काँग्रेसमधील संजय निरूपम यांची मनमानी हे कामत यांच्या राजीनाम्याचे महत्त्वाचे कारण असले तरी संघटनेत महाराष्ट्र व मुंबईचे प्रभारी सरचिटणीस मोहन प्रकाश यांच्या हस्तक्षेपाला मुंबईसह राज्यातील काँग्रेसजन कंटाळले आहेत.
पुढच्यावर्षी होणा-या मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी गुरुदास कामत यांच्यासारखा वजनदार नेता गमावणे पक्षाल परडवणार नसल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून सोनिया गांधींनी कामत यांच्याकडे राजस्थान व गुजरातचे प्रभारीपद सोपवले होते. या दोन्ही राज्यांतील काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांत कामत यांनी ऊर्जा निर्माण केली.
दरम्यान कामत यांच्या राजीनामा प्रकरणामुळे राहुल गांधींभोवती घोटाळणारे नेते व पक्षातल्या दिग्गजांनाही खडबडून जाग आली असून, त्याची गांभीर्याने दखल पक्षाच्या पुनर्रचनेत घेतली जाते की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *