गेल्या काही दिवसांपासून उभ्या महाराष्ट्राला मान्सूनची चाहूल लागलीय. एक दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये धडकेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. त्यामुळे आता प्रशासन आणि बळीराजा आपापल्या पातळीवर सज्ज झालाय.
हवामान विभागाने मंगळवारी वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे येत्या गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकेल. हवामान विभागाने यापूर्वी वर्तविलेल्या अंदाजामध्ये सात जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तविली होती. पण विविध कारणांमुळे मान्सूनचे भारतातील आगमन आणखी दोन दिवस लांबणीवर पडले आहे.
दरम्यान, पुढील २४ तासांत तामिळनाडूच्या उत्तर आणि दक्षिण भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. अंदमानातील पाऊस शुक्रवारीच पुढे सरकला असला तरी तो अजून केरळपर्यंत पोहोचलेला नाही.