अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री व डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या हिलरी क्लिंटन यांनी येथील अध्यक्षीय निवडणुकीसाठी पक्षाची उमेदवारी मिळविल्याचे निश्चित झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. सूत्रांनी केलेल्या पाहणीनुसार, डेमोक्रॅटिक पक्षाच्या 2,383 प्रतिनिधींचा पाठिंबा मिळविण्यात क्लिंटन या यशस्वी झाल्या आहेत. यामुले त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.
अमेरिकेतील एक प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाची अध्यक्षीय निवडणुकीसाठी उमेदवारी मिळविणाऱ्या क्लिंटन या पहिल्याच महिला ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांची ही घोडदौड ऐतिहासिक मानली जात आहे. दरम्यान, क्लिंटन यांचे प्रतिस्पर्धी बर्नी सॅंडर्स यांनी क्लिंटन यांचा विजय झाला नसल्याचा दावा केला आहे. अद्यापी क्लिंटन या “सुपरडेलिगेट्स‘वर (विशेष प्रतिनिधी) अवलंबून असून त्यांचे मतदान येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनादरम्यान होणार असल्याचे सॅंडर्स यांनी म्हटले आहे.
प्योर्टो रिको येथे मिळविलेला मोठा विजय आणि सुपरडेलिगेट्सचा आयत्या वेळी मिळालेला पाठिंबा, यामुळे क्लिंटन यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.