भारतीय क्रिकेट संघाचे माजी संचालक रवी शास्त्री यांनीही भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी यापूर्वी अर्ज केला होता.
शास्त्री यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी मी अर्ज केला आहे. प्रशिक्षकपदाच्या जाहिरातीत ज्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला होता, त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून मी अर्ज केला आहे. बीसीसीआयला आणखी काय हवे असल्यास मी द्यायला तयार आहे. या पदासाठी अर्ज करण्याचे माझे काम होते, ते मी केले आहे. या व्यतिरिक्त मी आणखी काही सांगू शकत नाही.
रवी शास्त्री यांनी यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे 18 महिने संचालक म्हणून काम पाहिलेले आहे. बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. प्रशिक्षक होणाऱ्या व्यक्तीला हिंदी येणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भारतीय संघाला मायदेशातील प्रशिक्षक मिळण्याची दाट शक्यता आहे. या पदासाठी यापूर्वी निवड समितीचे प्रमुख संदीप पाटील यांनी अर्ज केला आहे.