‘एक्‍स्प्रेस वे’वरील अपघातात 17 जण ठार

‘एक्‍स्प्रेस वे’वरील अपघातात 17 जण ठार

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (एक्‍स्प्रेस वे) अपघातांची मालिका सुरूच आहे. या महामार्गावर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात 17 जण ठार झाले, तर 45 प्रवासी जखमी झाले. मृतांमध्ये आठ महिला आणि दोन बालिकांचा समावेश आहे.

पाऊस आणि दाटलेले धुके अशा वातावरणात खासगी आरामबसने शिवकर गावाजवळ रस्त्यावरच थांबलेल्या दोन कारना जोरदार धडक दिली. त्यानंतर ही तिन्ही वाहने जवळच्या खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात दोन्ही कारचा चेंदामेंदा झाला, तसेच आरामबसचीही अवस्था दयनीय झाली होती.

दुर्घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्ते विकास महामंडळाच्या बचाव पथकाला पाचारण केले. आयआरबी, 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांसह खासगी रुग्णवाहिकाही दाखल झाल्या. बचाव पथकाने पोलिसांच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमी प्रवाशांना तातडीने नवीन पनवेलमधील अष्टविनायक, पनवेलमधील पॅनासिया, लाइफलाइन व गांधी आणि कामोठे येथील एमजीएम रुग्णालयांत दाखल केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजप आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली, तसेच रुग्णालयांत जाऊन जखमींची विचारपूस केली.

मृतांची नावे : वैजयंती गुजर (35), चंद्रभागा चव्हाण (50), चतुरा कदम (55), प्रिया कदम (23), अनन्या कदम (चार महिने), वेदिका यादव (अडीच वर्षे), ऋतिका गायकवाड (30), श्रद्धा काळे (20), पद्मा बलदवा (39), कविता गायकवाड (32), विलास माने (62), संदीप शिवणकर (39), काशिनाथ निकम (45), संदीप चव्हाण (32), अविनाश करंडे (39), इक्‍बाल शेख (50, बसचालक).

जखमींची नावे : सुनीता डिगे, ओम डिगे, निशा यादव, अनिता निकम, मनोहर बुजाहर, अक्षय गुजर, श्रुती शिवांतक, सुषमा शिवणकर (सर्व सातारा), ओमकार साळुंखे (लोणंद), प्रवीण खोपडे (भांडुप), नीलेश नाळे, सिद्धेश कदम, राज अपनाथ, ओमकार मानगोळी, आर्या बहादपुरे (सर्व ठाणे), सुनील गोडसे, सोनल गोडसे, संगीता गोडसे, संदेश गोडसे (सर्व दिवा), प्रकाश गायकवाड (कळवा), योगेश खराडे (डोंबिवली), निर्मयी भोईटे, अश्‍विनी भोईटे (दोघीही कल्याण), सागर पाटील, विपिन म्हात्रे (दोघेही घणसोली), जगन्नाथ दळवी (अंधेरी), रितेश चव्हाण (जोगेश्‍वरी), लता काळे (कांदिवली).

“जखमींवर सरकारी खर्चाने उपचार‘ 

दुर्घटनेतील जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यात येतील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पनवेलमधील पॅनासिया आणि गांधी रुग्णालयांत रुग्णांची हेळसांड होत आहे, अशी तक्रार नगराध्यक्षा चारुशीला घरत आणि शिवसेनेचे विधानसभा संघटक दीपक निकम यांनी केली. पैसे दिल्याशिवाय जखमींना दाखल करून घेण्यास रुग्णालयांनी नकार दिला, असा आरोपही त्यांनी केला. जखमींवर प्रथम उपचार करा, अशी कडक समज रुग्णालयांना द्या, असे निर्देश शिंदे यांनी पनवेल तालुका प्रशासनाला दिले. वेगमर्यादा ओलांडणे, “लेन कटिंग‘ याबाबत कडक कायदे करू, असेही त्यांनी सांगितले.

…असा झाला अपघात 
मुंबईच्या दिशेने येणारी स्विफ्ट कार टायर पंक्‍चर झाल्याने एक्‍स्प्रेस-वेवर शिवकर गावाजवळ थांबली होती. मात्र ही कार रस्त्याच्या डाव्या कडेला उभी न करता पहिल्या मार्गिकेतच थांबवून पंक्‍चर काढण्याचे काम सुरू होते. या कामात मदत करण्यासाठी एक इनोव्हा कार डाव्या बाजूला थांबली होती. या वेळी पाऊस सुरू होता, तसेच धुके दाटले होते. पहाटे सव्वापाचच्या सुमारास साताऱ्याहून मुंबईकडे चाललेल्या निखिल ट्रॅव्हल्सच्या आरामबसने आधी स्विफ्ट आणि नंतर इनोव्हा कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर तिन्ही वाहने जवळच्या खड्ड्यात पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *