दुमदुमणारा शिवजयघोष, तुतारीची ललकारी अन् भारावलेल्या शिवभक्तांचा जल्लोष दुर्गराज रायगडने आज अनुभवला. गडपूजन, शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके व रात्री रंगलेल्या शाहिरीने शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येस रंग भरला.
समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज शहाजीराजे गडपायथ्याखालून गडावर चालत आल्यांनतर, शिवभक्तांनी त्यांचे ढोल-ताशांच्या कडकडाटात स्वागत केले. दरम्यान, आज (सोमवार) संभाजीराजे यांच्या हस्ते शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे प्रमुख उपस्थित राहतील.
समितीतर्फे शिवराज्याभिषेकासाठी गड तयार झाला आहे. गडावर आज पहाटे पाऊस झाला. सकाळी मेघडंबरीची फुलांनी सजावट केली. सकाळपासून गडावर शिवभक्त चालत आले. हातात भगवे ध्वज व शिवरायांचा जयघोष करत येणाऱ्या शिवभक्तांनामुळे गड शिवमय झाला. युवराज संभाजीराजे व युवराज शहाजीराजे यांनी गडपायथ्याखालील चित्त दरवाजा येथून दुपारी साडेचारला गड चढण्यास सुरवात केली. गडाच्या पायऱ्या चढून ते महादरवाजा येथे आल्यानंतर शिवभक्तांनी जल्लोष केला. ढोल-ताशांच्या कडकडाटाने आसमंत दणाणून गेला. संभाजीराजे यांच्या हस्ते दरवाजाला कलशाचे तोरण बांधले. शिरकाई मंदिर येथे महिलांनी त्यांचे औक्षण केले. गड पूजनानंतर होळीच्या माळावर शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांनी गड थरारला. फिरफिरणारी लाठी, वेगात फिरणारा पट्टा, तलवारीचे सपासप ढालीवर होणारे वार यांनी टाळ्यांची दाद घेतली. या कार्यक्रमानंतर राज सदरेवर संभाजीराजे यांच्या हस्ते शिवछत्रपतींवर लिहिलेल्या विविध पुस्तकांचे प्रकाशन झाले. हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांचे “शिवरायांची जलनीती व दुष्काळ‘ या विषयावर व्याख्यान झाले.
