टायगर टेम्पलच्या फ्रिजमध्ये सापडले बछड्यांचे मृतदेह

देशी-विदेशी पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या थायलंडमधील कांचनाबुरी येथील वाट फा लाँग टा बुआ मंदिरातील फ्रिजमध्ये वाघाच्या ४० बछड्यांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे बछडे एक ते दोन दिवसांच्या वयाचे असून त्यांचा मृत्यू नेमका कधी झाला हे सांगता येणार नाही,असे पोलिस अधिकारी कर्नल बंडिथ मेउन्स्गुखुम यांनी सांगितले. दरम्यान. विशेषत: भारतीयांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले हे टायगर टेम्पल बंदच करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

थायलंडमधील हे मंदिर ‘टायगर टेम्पल’ नावानेही ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी मंदिरातून पूर्ण वाढ झालेल्या १३७ वाघांना पुन्हा जंगलात सोडण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी राष्ट्रीय उद्यानाच्या एका अधिका-याची नेमणूक करण्यात आली होती. मंदिरातील कर्मचा-यांकडून वापरण्यात येणा-या फ्रिजमध्ये या अधिका-याला बछडय़ांचे मृतदेह सापडले असून या बछडय़ांची बहुतांश वाढ झाली होती. वाघांचे अवैध प्रजनन आणि तस्करी केली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. हे मृतदेह फ्रिजमध्ये का ठेवण्यात आले, याबाबत चौकशी सुरू असल्याचे अधिका-यांनी सांगितले. बछडय़ांच्या जन्मानंतर त्याचा लगेच मृत्यू झाल्यास त्याला न पुरण्याचा निर्णय माजी पशुवैद्यकीय अधिका-यांनी घेतला असल्याचे फेसबुकच्या पेजवर प्रसिद्ध करण्यात आले होते.

हे मंदिर पर्यटकांचे आकर्षण असून येथील प्रशासन वाघांच्या तस्करीसंदर्भातील नियमांना, कायद्यांना जुमानत नसून येथे प्राण्यांची देखभालही योग्य प्रकारे घेतली जात नसल्याचा आरोप एका स्वयंसेवी संस्थेकडून करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *