दररोज भोजनासाठी लागेल एवढी माधुकरी पाच घरी मागायची व त्यावर दिवसभराचा उदरनिर्वाह करून अभ्यासाला लागायचे हा त्याचा नित्यक्रम. त्यातच आई मनोरुग्ण. तिचीही काळजी तो घ्यायचा. अशा परिस्थितही जिद्द कायम होती. अभ्यासात त्याने कधीही खंड पडू दिला नाही. अखेर तो सोनियाचा दिन उगवला. दहावीच्या परीक्षेत त्याने तब्बल 90 टक्के गुण मिळविले. हातात गुणपत्रिका घेऊन तो डबडबलेल्या डोळ्यांनी आईसमोर उभा राहिला. मात्र, मनोरुग्ण असलेल्या आईला काहीही कळाले नाही; मग हे यश सांगणार कुणाला? आनंद साजरा करणार तरी कसा? हिंगोलीच्या कुणाल किशोर देशपांडेची ही यशोगाथा अन् व्यथाही.
येथील मंगळवारा भागातील किशोर देशपांडे हे जिल्हा परिषद कार्यालयात कार्यरत होते; मात्र दहा वर्षांपासून वडिलांनी घर सोडून दिले. हा धक्का त्याच्या आईला सहन झाला नाही अन् त्यांची मानसिक स्थिती बिघडली. घरी बहीण व कुणाल हे दोघेच. मात्र, लहान असल्यामुळे काहीही करता येईना. घरात खाण्या-पिण्याचे वांधे असताना शिक्षणाचे काय, असा प्रश्न दोघांसमोरही उभा राहिला. मात्र या परिस्थितीवर दोन्ही भावंडांनी जिद्दीने मात केली. सध्या त्याची बहीण परभणी येथे नातेवाईकाकडे राहून बारावीचे शिक्षण घेते. कुणाल अभ्यासात हुशार असल्यामुळे त्याच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचा निर्णय गोकूळ बंडाळे यांनी घेतला. त्यांना वसंतराव बंगाळे, व्ही. एन. कुलकर्णी, प्रदीप नर्सीकर यांनीही सहकार्य केले. तर माणिक स्मारक विद्यालयाचे पदाधिकारी व शिक्षकांनीही सहकार्य केले.
दररोज भोजनासाठी लागेल एवढी माधुकरी पाच घरी मागायची व त्यावर दिवसभराचा उदरनिर्वाह करून अभ्यासाला लागायचे हा त्याचा नित्यक्रम होता. सायंकाळी पाच ते साडेसहा या वेळेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाचनालयात जाऊन तेथे तो अभ्यास करायचा. दहावीची परीक्षा चांगल्या रीतीने दिल्यानंतर त्याला किमान 85 टक्के गुण मिळतील अशी अपेक्षा होती. अपेक्षेपेक्षाही त्याला मोठे यश मिळाले. गुणपत्रिका हातात पडताच कुणालचे डोळे पाणावले. तब्बल नव्वद टक्के गुण मिळविल्यानंतरही मानसिक स्थितीत खचलेल्या आईकडे जाऊन आनंद साजरा करायचा की शांत राहून पुढचा निर्णय घ्यायचा हे काही काळ त्याला कळलेच नाही.
अखेर त्याने आधार दिलेल्या गोकूळ बंडाळे यांचे घर गाठून त्यांच्या हातात गुणपत्रिका ठेवून पायावर डोके ठेवले. त्याची गुणपत्रिका पाहून श्री. बंडाळे यांनाही कुणाल यास केलेल्या मदतीचे सार्थक झाल्याचे समाधान वाटले. दोघांनीही नजरा नजर करून आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. विशेष म्हणजे कुणालने संस्कृत विषयात 99, मराठीमध्ये 91, इतिहास- भूगोलमध्ये 94, तर इंग्रजी विषयात 90 गुण मिळविले आहेत. त्याच्या यशाचे शाळेनेही कौतुक करून त्याचा सत्कार केला. या वेळी यशस्वी अभियंता म्हणून करिअर करायचा निर्धार कुणालने व्यक्त केला.
