मध्य रेल्वेवर हजारो प्रवासी पाच तास लटकले

बुधवारी मुंबईत पाऊसही पडला नाही. रेल्वे रुळावरही पाणी तुंबले नाही; पण लोकल सेवा तब्बल पाच तास विस्कळीत झाली. याला निमित्त ठरले ठाण्याच्या दिशेने जाणा-या ओव्हरहेड वायर बिघाडाचे व पेंटाग्राफ तुटल्याचे.

या विस्कळीत रेल्वेचा हकनाक फटका लाखो चाकरमान्यांना बसला. मुंबई ते कल्याण हा खरे तर एक ते सव्वा तासांचा प्रवास. पण या प्रवासासाठी प्रवाशांना पाच तास लागले. या प्रवासात अनुभवलेले क्षण.. सारेच विलक्षण.. कंटाळवाणे.. नकोसे वाटणारेही!

मध्य रेल्वेच्या प्रवासातील अनंत अडचणी प्रवाशांना नव्या नाहीत. पावसाळ्यात रुळाखाली पाणी आल्याने बंद पडणा-या लोकल्स. ओव्हरहेड, पेंटाग्राफमधील बिघाडामुळे ही सेवा अनेकदा कोलमडते. बुधवारची रात्री चाकरमान्यांसाठी ‘घातवार’ ठरली. कामावरून सुटलेले प्रवासी नेहमीच्या गाडीने प्रवास करीत होते.

सव्वाआठच्या सुमारास ठाण्याकडे ओव्हरहेड वायरने मान टाकल्याने सगळी मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडून पडली. प्रत्येक स्थानकात उद्घोषणा होत होत्या. ठाणे ते मुंबईदरम्यानच्या अनेक स्थानकांत प्रवाशांची गर्दी उसळलेली. येणारी लोकल प्रवाशांनी तुडुंब भरून येत होती. मिळेल ती जागा पकडून प्रवासी घरी परतण्याचा प्रयत्न करीत होते. लोकलही हळूहळू, उशिराने सुरू होत्या. मुंबईहून कल्याणच्या दिशेने कूर्मगतीने ही वाहतूक सुरू होती.

गाडया कुर्ला स्थानकापर्यंत रखडत, रखडत चालल्या होत्या. कुर्ला स्थानकात अचानक कल्याणकडे जाणा-या धीम्या गतीच्या गाडया रद्द करण्यात आल्या. गाडया अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवासीही मजल-दरमजल करीत फास्ट गाडय़ांकडे वळले. खोपोली फास्ट लोकल कुर्ला स्थानकात थांबलेली. समोर लाल सिग्नल. प्रवाशांची चलबिचल. गाडी केव्हा सुटणार? प्रवाशांची मोटरमनकडे विचारणा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *