दुस-या महायुद्धाच्यावेळी बेपत्ता झालेली ब्रिटीश नौदलाची पाणबुडी तब्बल ७३ वर्षानंतर सापडली आहे. या पाणबुडीमध्ये तैनात असलेल्या ७१ नौसैनिकांचे मृतदेहही सापडले आहेत. इटलीच्या तावोलारा बेटाजवळ ही पाणबुडी सापडली. पाणबुडयांना पाण्याखाली १०० मीटर अंतरावर ही पाणबुडी सापडली.
दोन जानेवारी १९४३ रोजी ही पाणबुडी बेपत्ता झाली होती. इटालियन युध्दनौकांना नष्ट करण्याच्या मोहिमेवर ही पाणबुडी २८ डिसेंबर १९४२ रोजी माल्टा बंदरातून निघाली होती. ला माडालेना बंदरात थांबा घेतल्यानंतर ही पाणबुडी पुन्हा मोहिमेवर निघाली.
३१ डिसेंबरला शेवटचा सिग्नल या पाणबुडीकडून मिळाला. त्यानंतर ही पाणबुडी बेपत्ता झाली. या पाणबुडीला जलसमाधी मिळाली असा अधिका-यांचा समज झाला होता. पाणबुडीचे जे अवशेष मिळाले ते चांगल्या स्थितीत आहेत. ऑक्सिजन अभावी पाणबुडीतील नौसैनिकांचा मृत्यू झाला.
बोटीचे जे अवशेष आहेत त्यांना आदर मिळाला पाहिजे असे ब्रिटनच्या रॉयल नेव्हीने म्हटले आहे. सध्या पाणबुडीची खात्री पटवण्यासाठी रॉयल नेव्हीकडून जुने रेकॉर्ड तपासले जात आहेत.