डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातील केमिकल फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट होऊन १ ठार तर १००हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. गुरूवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील अभिनव शाळेसमोरील ‘आचार्य’ केमिकल कंपनीतील बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की स्फोटाच्या आवाजाने २ ते ३ किमी परिसर दणाणून गेला तर आसपासच्या परिसरातील अनेक इमारती तसेच गाड्यांच्या काचाही फुटल्या. या स्फोटात कंपनीतील तसेच त्या परिसरातील रस्त्यावरच्या नागरिकांसह एकूण १०० जण जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला ते अद्याप समजू शकलेले नाही.
दरम्यान या स्फोटाचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून ३ ते ४ रुग्णवाहिकाही दाखल झाल्या आहेत.
डोंबिवली पूर्वेकडील प्लॉट नंबर W2 58/59, MIDC Phase 2, येथील हर्बर्टब्राऊन (आचार्य)’ कंपनीत ११.३०- ११.४५ च्या सुमारास मोठा स्फोट झाला. या भीषण शक्तीशाली स्फोटामुळे आजूबाजूच्या सहा कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे.