बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. यामुळे खेळ थांबवण्यात आला आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात होणा-या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारतातर्फे या कसोटी सामन्यात पाच गोलंदाज आणि सहा फलंदाजांसह हरभजन सिंगचाही संघात समावेश आहे. या कसोटीत युवा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाचा खरा कस लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात एकदिवसीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने तडकाफडकी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराटची कसोटी कर्णधारपदी पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तो पहिल्यांदाच पूर्ण वेळ कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करणार आहे.
आतापर्यंत भारत-बांगलादेशदरम्यान सात कसोटी सामने झाले आहेत. यापैकी सहा सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला. तर २००७ मध्ये चित्तोंग येथे झालेला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध भारताचे पारडे जड दिसत असले तरी मात्र त्यांना कमी लेखून चालणार नाही. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड मध्ये नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषकात बांगलादेश संघाने चमकदार कामगिरी केली होती. इंग्लडसारख्या संघाला नमवत बांगलादेशने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले होते. त्यानंतर एप्रिलमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशने आपले नाणे खणखणीत वाजवत ३-० ने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. मात्र कसोटी मालिकेत सामना अनिर्णीत राहिला होता.

