भयंकर उकाडय़ाने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना रविवारी पावसाच्या शिडकाव्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांजूर व विक्रोळी या उपनगरांत रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान, ठाण्यातही रात्री उशिरा पाऊस झाला. २० मिनिटांच्या या पाऊस शिडकाव्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उकाडा कमालीचा वाढला असल्याने मुंबईकर घामाने चिंब झाले होते. रविवारची सकाळही त्यास अपवाद नव्हती. रविवारी कुलाबा येथे कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझमध्ये ३४.९ अंश इतके तापमान होते. दिवसभर उकाडा सहन केल्यानंतर रात्री आकाशात ढगांनी गर्दी केली आणि उत्तर मुंबईत पावसाचा शिडकावा झाला. अंधेरी, गोरेगाव, मालाड या परिसरात पावसाच्या सरी बरसत होत्या. तर कांजूर मार्ग, भांडुप, विक्रोळी व ठाणे परिसरातही पावसाचा शिडकावा झाला.
