भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली. तर, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीसी) अध्यक्ष अजय शिर्के यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
शशांक मनोहर आयसीसीचे अध्यक्ष झाल्यामुळे भारतीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मंडळाने रविवारी घेतलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनुराग ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आता शशांक मनोहर यांच्या जागा ठाकूर अध्यक्षपदाचे काम पहाणार आहेत.
ठाकूर यांना पूर्व विभागातील बंगाल, आसाम, झारखंड, त्रिपुरा तसेच नॅशनल क्रिकेट क्लब या सर्व संघटनांनी एकमताने पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानण्यात येत होती.
अखेर बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या हस्ते अनुराग ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.
