विनापरवाना डान्सबारवर छापा; 75 जणांना अटक

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने विनापरवाना सुरू असलेल्या चार डान्सबारवर छापे टाकून 60 महिलांची सुटका करण्यात केली आहे. तर बारमालक, व्यवस्थापक व ग्राहकांसह एकूण 75 जणांना अटक केली आहे.

आवश्‍यक ती परवानगी न घेता सुरु असलेल्या चार बारवर गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी छापा टाकला. त्यामध्ये ग्रॅंट रस्त्यावरील तेजस बार, घाटकोपरमधील मेहफील बार, अंधेरीतील पिंक प्लाझा बार व मुंबई सेन्ट्रलच्या समुंदर बारचा समावेश होता. परवानगी न घेता बार सुरू ठेवणे आणि महाराष्ट्र अश्‍लील नृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत छापे टाकण्यात आले. दहा वर्षांपूर्वी राज्य सरकारने डान्सबारवर आणलेली बंदी हटविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 15 मार्च रोजी दिली होता.

डान्सबार पुन्हा सुरू करण्यासाठी परवाना प्राप्तीच्या प्रक्रियेसठी मुंबई पोलिसांनी काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केले आहेत. मागील आठवड्यात तीन डांसबारना पोलिसांकडून सशर्त परवाने देण्यात आले. 12 एप्रिल रोजी विधानसभेत डान्सबार नियमन विधेयक संमत करण्यात आले आहे. या विधेयकानुसार नियमभंग किंवा महिला कर्मचाऱ्यांचे शोषण किंवा बारमध्ये अश्‍लील नृत्य अशा प्रकारांची जबाबदारी बार मालकावर असणार आहे. नियमभंग केल्यास बार मालकाला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि पंचवीस हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. डान्स बार हे शैक्षणिक किंवा धार्मिक ठिकणांपासून किमान एक किलोमीटर दूर असावेत आणि ते संध्याकाळी सहा ते रात्री साडे अकरा पर्यंतच सुरू ठेवावेत अशी तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *