66 जणांसह पॅरिसहून कैरोला जाणारं इजिप्तएअरचं विमान रडारवरुन गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. इजिप्तएअर A320 (फ्लाईट क्रमांक MS804) बेपत्ता झाल्याचं कंपनीतर्फे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे.
विमान 37 हजार फूट उंचीवरुन उडत असताना मेडिटेरिअन समुद्रावरुन बेपत्ता झाल्याचं एअरलाईनतर्फे सांगण्यात आलं आहे. पॅरिसच्या स्थानिक वेळेनुसार रात्री 11 वाजून 9 मिनिटांनी विमानाने उड्डाण केलं. पहाटे 3 वाजून 15 मिनिटांनी हे विमान लॅण्ड होणं अपेक्षित होतं, मात्र 2 वाजून 45 मिनिटांनी विमानाशी संपर्क तुटला.
विमानात 56 प्रवासी आणि 10 केबिन क्रू आहेत. यापैकी 15 फ्रेंच, 30 इजिप्तचे नागिरक आहेत. इजिप्तएअरतर्फे कैरो विमानतळाजवळ प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी डॉक्टर, दुभाषांची सोय केली आहे, तसेच वेळोवेळी अपडेट्स दिले जात आहेत. इजिप्त नौदलाने सध्या शोध आणि बचाव मोहिम हाती घेतली आहे.