कॉंग्रेस परिवाराचा आणि गांधी कुटुंबियांचा अपमान करून मोदींकडून पद्मभूषण मिळवा, अशा आशयाची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केल्या आहेत.

देशातील महत्त्वाच्या संस्थांना आणि ठिकाणांना गांधी परिवारातील सदस्यांची नावे दिल्याबद्दल अभिनेता ऋषी कपूर यांनी ट्विटरद्वारे बुधवारी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. “देशाला बापाचा माल समजू नका‘ अशा तीव्र शब्दांत कपूर यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आज (गुरुवार) दिग्विजयसिंह यांनी ट्विटरद्वारे कपूर यांच्यावर टीका केली. “कॉंग्रेस परिवार आणि गांधी कुटुंबियांना अपमानित करा. स्वत:ला मोदींकडून पद्मभूषण किंवा राज्यसभेची जागा मिळवून सन्मानित करा‘, अशा शब्दांत त्यांनी प्रत्युत्तर दिले. कपूर यांच्या तिखट शब्दांतील टीकेनंतर त्यावर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. कपूर यांच्याप्रमाणेच देशातील अनेकांना असे वाटते आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केली.