मंत्रालयात काढा वाघासोबत सेल्फी

सेल्फी, सेल्फी… सध्या सेल्फीची इतकी क्रेझ वाढली आहे की, प्रसंग आणि आजूबाजूची परिस्थिती काहीही असो; पण एक सेल्फी झालाच पाहिजे. आपला सेल्फी कसा उत्तम येईल, यासाठी प्रयत्न करीत असतो, ही क्रेझ लक्षात घेता वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी वाघासोबत सेल्फी काढण्याची नवी युक्ती लढविली आहे. त्यासाठी मंत्रालयात वाघाची प्रतिकृती कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असून बांधकाम विभागाला जागेची मागणी केली आहे.

वन व वन्यजीवप्रेमींना आणि इतरांनादेखील वाघासारख्या दिसणाऱ्या सुंदर आणि राजबिंड्या प्राण्यासोबत फोटो घेण्याचे सर्वांना आकर्षण असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मुलींसोबत सेल्फी काढून बेटी बचाव अभियानाचा संदेश जगभर दिला होता. त्याच धर्तीवर वाघाचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे यासाठी मुनगंटीवार यांनीही नवीन उपक्रम हाती घेतला आहे.

मानव, वने, वन्यजीव आणि पर्यावरण याचे जवळचे नाते आहे. जीवसृष्टीसाठी शुद्ध हवा, पाणी, सकस अन्न या तिन्हीचा आधार वनेच आहेत. सजीवसृष्टीच्या निर्मितीपासून माणसाला याची जाणीव आहे. वृक्ष, वन्यजीव, जैवविविधता याचा मानवी जीवनावर अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे लक्षात घेऊन याचे सुयोग्य नियोजन आणि संवर्धन करण्यासाठी वनमंत्र्यांनी तीन वर्षांचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यात याचा समावेश आहे.

वाघाचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून व्याघ्रदिनाचे औचित्य साधून मंत्रालयात वनविभागाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी वाघांचे दुर्मिळ छायाचित्र आमि प्रतिकृतींचे प्रदर्शन भरविले होते. या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला. येथील वाघाच्या प्रतिकृतीसोबत स्वतःचा आणि समूहासोबत अनेकांनी सेल्फी काढून घेतला. त्यातून वन आणि वन्यजीव प्रेमींचे संरक्षित आणि संवर्धनाबाबत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या जनजागृती झाली. मंत्रालयात सात हजार कर्मचारी असून दररोज हजारो नागरिक येथे येतात. त्यांना राजबिंड्या वाघासारख्या दिसणाऱ्या प्रतिकृतीसोबत सेल्फी काढता यावी आणि संवर्धनाचा संदेश देता यावा यासाठी हे पाऊल टाकण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *