कणकवली-वैभववाडी व देवगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नोकरी एक्सप्रेसचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कणकवलीच्या सभापती आस्था सर्पे, उपसभापती बाबा वर्देकर, पंचायत समिती सदस्य महेश गुरव, माजी सभापती प्रकाश सावंत, विनय यादव, सुभाष सावंत, मिलिंद मेस्त्री, कलमठचे सरपंच निसार शेख, महेश लाड, संतोष चव्हाण, शशिकांत राणे, सचिन पारधिये, स्वप्नील चिंदरकर, कमलेश नरे आदी उपस्थित होते.
आचरा रोडवरील कणकवली जि.प. शाळा क्र. १ येथे या नोकरी एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला. या माध्यमातून ६५ जणांना विविध कंपन्यांमधून नियुक्ती पत्रे देण्यात आली. डेक्कन मॅनेजमेंट पुणे या कंपनीतर्फे कमवा व शिका या तत्त्वावर दरमहा ८५०० प्रमाणे २४ तरुणांना नोकरी देण्यात आली.
पुढील वर्षी या उमेदवारांना ९,५०० रुपये पगार देण्यात येणार आहे. अशा वेतनाबरोबरच अभ्यास पूर्ण झाल्यावर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ तसेच टिळक विद्यापीठाचे मॅकॅनिकल डिप्लोमा सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवारांपैकी एका तरुणाला हॉटेल मॅनेजमेंट गोवा येथे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. त्याला लॉबी असिस्टंट या पदावर नियुक्ती देण्यात आली असून महिना १६ हजार रुपये पगार देण्यात आला आहे. आयटीएम मॅनेजमेंट मुंबई या कंपनीत २ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. १० तरुणांना दरमहा १०,५०० रुपये पगारावर सेक्युरिटी गार्ड म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
अॅक्सिस बँकेत ४ तरुणांना नोकरी देण्यात आली आहे. तर ११ जणांची नावे प्रतीक्षा यादीत आहेत. त्यांनाही काही महिन्यांनंतर नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहेत. १५० तरुणांनी या नोकरी एक्सप्रेसच्या उपक्रमाला भेट दिली. या उपक्रमाचा जिल्ह्यातील सर्व तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

