पंजाबविरुद्ध मुंबईचे पारडे जड

पंजाबविरुद्ध मुंबईचे पारडे जड

सनरायझर्स हैदराबादकडून ८५ धावांनी दारुण पराभव पत्करणाऱ्या मुंबई इंडियन्सने बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर मात केली. आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असताना हीच विजयी घोडदौड कायम राखत किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवण्याचा निर्धार मुंबईने केला आहे. आयपीएल गुणतालिकेत सध्या मुंबई इंडियन्सचा संघ चौथ्या स्थानावर आहे. मुंबईच्या खात्यावर ११ सामन्यांत सहा विजयांसह १२ गुण जमा आहेत. तर १० सामन्यांत ७ पराभव पत्करणारा किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असून, त्यांचे स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळेच या सामन्यात मुंबईचे पारडे जड मानले जात आहे. रोहित

कुशलतेने मुंबईचे नेतृत्व करीत आहे. याशिवाय मुंबईकडून सर्वाधिक एकूण धावासुद्धा त्याच्याच नावावर आहेत. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा डाव फक्त ९२ धावांत संपुष्टात आला होता. त्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये अपयशी ठरलेल्या मुंबईने बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात सावरण्याचा गांभीर्याने प्रयत्न केला. मुंबईने बंगळुरूला एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर फक्त १५१ धावांत रोखले. त्यानंतर मुंबईने ६ विकेट्स आणि ८ चेंडू राखून हे आव्हान लीलया पेलले. किरॉन पोलार्ड आणि जोस बटलरसारख्या फलंदाजांमुळे मुंबईची ताकद अधिक मजबूत झाली आहे.

मिचेल मॅक्क्लिनॅघन आणि टिम साऊदी यांनी बंगळुरूच्या सामन्यात ख्रिस गेल आणि विराट कोहली या स्फोटक फलंदाजांना लवकर तंबूची वाट दाखवण्याची किमया साधली होती. फिरकीपटू हरभजन सिंग प्रभावी गोलंदाजी करीत आहे. याशिवाय मध्यमगती गोलंदाज जसप्रित बुमराह, हार्दिक आणि कृणाल पंडय़ा असे उत्तम पर्याय रोहितकडे उपलब्ध आहेत.

दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ बंगळुरूकडून फक्त एक धावेने पराभव पत्करून या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. त्या सामन्यात विजयने ५७ चेंडूंत सर्वाधिक ८९ धावांची खेळी साकारली होती. मार्कस स्टॉइनिसनेसुद्धा हाणामारीच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली होती. परंतु सांघिक कामगिरी न झाल्यामुळे पंजाबचा संघ पराभूत झाला.

स्पर्धा मध्यावर आली असताना संघाचे नेतृत्व भारताच्या मुरली विजयकडे सोपवण्यात आले असले तरी संघाच्या कामगिरीत मात्र कोणतीही सुधारणा झालेली नाही. डेव्हिड मिलर आणि ग्लेन मॅक्सवेल यांचा फॉर्मसुद्धा चिंताजनक आहे. मॅक्सवेल मागील सामन्यात खेळ शकला नव्हता. मात्र त्याला विश्रांती दिल्याचे संघव्यवस्थापनाने स्पष्ट केले. संदीप शर्मा, मोहित शर्मा, अक्षर पटेल आणि स्टॉइनिस या गोलंदाजांकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *