आयपीएलच्या नवव्या हंगामातील बुधवारी (११ मे) होणा-या लढतीमध्ये बंगळूरु रॉयल चॅलेंजर्ससमोर गतविजेता मुंबई इंडियन्सचे आव्हान आहे. सध्याची कामगिरी पाहता रोहित शर्मा आणि सहका-यांचे पारडे जड आहे. मात्र सातत्य राखण्यास यजमान उत्सुक आहेत.
१० सामन्यांतून पाच विजयांसह (१० गुण) मुंबईने गुणतालिकेत पाचवे स्थान राखले आहे. बंगळूरुला ९ सामन्यांतून पाच विजय मिळवता आलेत. ते मुंबईपाठोपाठ आहेत. मुंबईला मागील लढतीत सनरायझर्स हैदराबादकडून मात खावी लागली.
विराट कोहली आणि सहका-यांनी रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि किंग्ज इलेवन पंजाबला हरवत छान पुनरागमन केले आहे. घरच्या मैदानावर सातत्य राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. नवव्या हंगामातील पहिल्या लढती (मुंबई) घरच्या मैदानावर मुंबईने बाजी मारली होती.
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर यजमानांशी दोन हात करताना त्यांना हा विजय महत्त्वाचा ठरेल. दुसरीकडे, फॉर्म मिळवलेला बंगळूरु मागील पराभवाचा वचपा काढण्यासह सातत्य राखण्याचा प्रयत्न करेल. मुंबईच्या चार तसेच बंगळूरुच्या पाच लढती शिल्लक आहेत. त्यामुळे बाद फेरी गाठण्यादृष्टीने (प्ले ऑफ) उभय संघांसाठी पुढील प्रत्येक लढत महत्त्वाची आहे.
मुंबईची भिस्त कर्णधार रोहित शर्मासह मध्यमगती दुकली मिचेल मॅकक्लेनॅघन आणि जसप्रीत बुमरावर आहे. रोहितची विकेट पडल्यानंतर फलंदाजीचे तीन तेरा वाजतात, हे हैदराबादविरुद्ध दिसून आले.
त्यामुळे अंबाती रायुडू, पार्थिव पटेल, कीरॉन पोलार्ड तसेच जोस बटलरच्या योगदानावर मुंबईची फलंदाजी अवलंबून राहील. गोलंदाजी उंचावण्यासाठी मॅकक्लेनॅघन, बुमराला अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंग, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ाकडून समर्थ साथ अपेक्षित आहे.
बंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीही जबरदस्त फॉर्मात आहे. त्याला एबी डेविलियर्स आणि लोकेश राहुलची चांगली साथ लाभली आहे. ख्रिस गेलचा फॉर्म चिंतेची बाब असली तरी कोहली, डेविलियर्स आणि राहुलने फलंदाजी तारली आहे.
यजमानांची फलंदाजी थोडी कमकुवत वाटते. शेन वॉटसनने अष्टपैलू कामगिरी करताना गोलंदाजीची भिस्त पेलली आहे. लेगब्रेक युझवेंद्र चहलने थोडी चमक दाखवली तरी अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नी, वरुण आरोन आणि ख्रिस जॉर्डनने निराशा केली आहे.