लालबावटा संघटनेच्या पुरुष सदस्यांनी सविता पाटील या 35 वर्षीय विवाहित महिलेला भर रस्त्यात अडवून विवस्र करून लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती मिळते आहे.
वाचवण्यासाठी आलेल्या पतीलाही जबर मारहाण
मागील महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी श्रमजीवी संघटनेच्या पॅनेलचं काम केल्याचा राग मनात ठेवून लालबावटा संघटनेच्या पुरुष सदस्यांनी सविता पाटील यांना जबर मारहाण केली. त्यावेळी सविता यांना वाचवण्यासाठी आलेल्या त्यांचा पती संतोष पाटील व इतर कार्यकर्त्यांनासुद्धा त्यांचा पाठलाग करुन, रस्त्यात पाडून लाकडी दांडक्याने मारहाण केली.
वाद काय होता?
भिवंडी तालुक्यातील पडघा गावा नजीकच्या पाच्छापूर रस्त्यावरील मैंदे या गावाची ग्रुपग्रामपंचायत असून, हे गाव आदिवासी उपाय योजनेअंतर्गत येत असल्याने येथील सरपंचपद आदिवासी समाजाकरता राखीव असल्याने आदिवासी समाजाला निवडणुकीत आपल्या बाजूने ठेवण्यात सर्वच राजकीय पक्ष, विविध संघटना प्रयत्नशील असतात. या गावात श्रमजीवी संघटना कार्यरत असून त्या गावात कॉम्रेड गोदाताई परुळेकर विचार मंच ही कम्युनिस्ट संघटनासुद्धा कार्यरत झाली असल्याने, या दोन्ही आदिवासी समाजाच्या न्याय हक्क साठी लढणाऱ्या संघटना निवडणुकीच्या राजकारणामुळे आपापसात भिडल्या आहेत.
सविता या श्रमजीवी संघटनेच काम करीत असल्याने व ती गावाच्या राजकारणात विरोध करत असल्याने त्याचा राग गावातील विद्यमान सरपंच संतोष गणपत पाटील व त्यांचे समर्थक भिवा शेंडे, निर्मला भिवा शेंडे, लक्ष्मण वाडू या विरोधकांनी तिचा अडसर दूर करण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना विवस्र करून मारहाण करण्याची घटना घडली.
मारहाणीची घटना घडल्यानंतर पडघा पोलीस ठाण्याला कळवण्यात आले. मात्र, तब्बल तीन तासांनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.
दरम्यान, मारहाणीत जखमी झालेल्यांना भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सविता पाटील यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी एकूण 22 जणांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आले आहे.
पोलिसांनी आपल्याला न्याय मिळवून न दिल्यास, पडघा पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा सविता पाटील यांनी दिला आहे.