आयपीएल-९मध्ये शनिवारी (७ मे) होणा-या दुस-या लढतीमध्ये तळातील किंग्ज इलेवन पंजाबविरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्सला विजयाची संधी आहे. मात्र मुरली विजयच्या नेतृत्वाखालील यजमानांना कमी लेखून चालणार नाही.
दिल्लीने ८ सामन्यांत ५ विजयांसह (१० गुण) तिसरे स्थान मिळवले आहे. यंदाच्या मोसमात झहीर खान आणि सहका-यांनी चांगली कामगिरी केली आहे. बाद फेरीतील त्यांचे स्थान नक्की वाटते. मात्र सातत्य राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. मागील लढतीत त्यांना महेंद्रसिंग धोनीच्या पुण्याकडून मार खावा लागला. तळातील संघ म्हणून दिल्लीला पंजाबविरुद्ध तशी चूक करून चालणार नाही.
क्विंडन डी कॉकसह जेपी दुमिनी, संजू सॅमसन आणि करुण नायरने फलंदाजीत चमक दाखवली आहे. मात्र आघाडीतील श्रेयस अय्यर, ख्रिस मॉरिसचे अपयश त्यांच्यासाठी चिंताजनक आहे. लेगस्पिनर अमित मिश्रासह कर्णधार आणि मध्यमगती गोलंदाज झहीर खान, ख्रिस मॉरिसने गोलंदाजीचा भार वाहिला आहे. मात्र मध्यमगती मोहम्मद शामी तसेच साडेआठ कोटी मोजून करारबद्ध अष्टपैलू पवन नेगी यांना सूर गवसलेला नाही.
पंजाबला आठ सामन्यांत दोन सामने जिंकता आलेत. नेतृत्वबदलानंतर गुजरातला हरवून त्यांनी पराभवाची मालिका खंडित केली तरी माजी विजेता कोलकात्याविरुद्ध पुन्हा नन्नाचा पाढा कायम राहिला. साखळीतील केवळ ६ सामने शिल्लक असल्याने नवा कर्णधार मुरली विजय आणि सहका-यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सलामीवीर विजयसह ग्लेन मॅक्सवेलने फलंदाजीत छाप पाडली तरी शॉन मार्शची अनुपस्थिती त्यांना जाणवतेय.
माजी कर्णधार डेव्हिड मिलर, मनन वोहरा, वृद्धिमन साहा अद्याप फॉर्मच्या प्रतीक्षेत आहेत. मध्यमगती मोहित शर्मासह डावखुरा स्पिनर अक्षर पटेल आणि मध्यमगती संदीप शर्माने ब-यापैकी गोलंदाजी केलीय. मात्र फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे त्यांचे प्रयत्न तोकडे पडताना दिसतात. ‘झाले गेले विसरून’ पंजाबकडून दुस-या सत्रात चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. त्याची सुरुवात त्यांना दिल्लीविरुद्ध घरच्या मैदानावरूनच करावी लागेल.