दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. या चकमकीत एकही जवान व नागरिक जखमी झालेला नाही.
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील पंझगाम गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती शुक्रवारी रात्री मिळाली होती. त्यानंतर लष्करी जवानांकडून परिसरात शोधमोहिम सुरु होती. दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत या तिन्ही दहशतवाद्यांना ठार केले.
चकमकीत ठार झालेले तिन्ही दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीन दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. त्यांच्याजवळून 3 एके-47 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली असून, अश्फाक अहमद दार, इश्फाक अहमद बाबा आणि हसीब अहमद अशी त्यांची नावे आहेत. या भागात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लष्कराची शोधमोहीम सुरु आहे.